पुणे : पुणे शहराची ओळख आता ड्रग्जचे शहर म्हणून झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठं ड्रग्ज रॅकेट्स समोर येत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा विश्रांतवाडी परिसरात एमडी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्जचे बाजार मूल्य १ कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळत आहे. साधारण ५०० ग्रम एमडी डॅक्सचा साठा पोलिसांकडून जप्त केला आहे. या कारवाईत तिघांना अटक केली आहे.
श्रीनिवास संतोष गोदजे (वय-२१, रा. धानोरी), रोहित शांताराम बेंडे (वय-२१, रा. लोहगाव), निमिश सुभाष अबनावे (वय-२७, रा. विघ्नहर्ता अपार्टमेंट, टिंगरेनगर, लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार संदिप दामोदर शिर्के यांनी विश्रांतवाडी पालीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील टिंगरेनगर परिसरातील विघ्नहर्ता अपार्टमेंटमध्ये तिघे जण आले. त्यांच्याकडे अमली पदार्थ असल्याचा संशय असल्याची बातमी अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता तिघे जण रस्त्याच्याकडेला उभे होते. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे ४७१ ग्रॅम मेफेड्रॉन, ४ मोबाईल, दुचाकी, कार आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा १ कोटी ८९ हजार ४६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जच्या विळख्यात
पुण्यातील ससून रुग्णालयाच्या जवळ ३० सप्टेंबर 2023 रोजी तब्बल २ कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन हे ड्रग्ज सापडले होते. तेव्हापासूनच ड्रग्जचे पुणे कनेक्शन उघड होण्यास सुरुवात झाली. मात्र, अद्यापही संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी पोहोचणे पोलिसांना शक्य झालेले नाही. पुण्यात वारंवार ड्रग्ज सापडत आहे. दरम्यान, ड्रग्जचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा आणि तस्करी कोरेगाव पार्क, कल्याणीनगर त्याचबरोबर खराडीसारख्या उच्चभ्रू भागात होत असल्याने पोलिसांनी या परिसरात सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं आहे.