पौड, (पुणे) : पुण्यातील मुळशी तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पंचवीस वर्षीय गरोदर प्रेयसीवर प्रियकराने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. दारवली (ता. मुळशी) येथे सिंबायोसिस कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. जखमी गरोदर प्रेयसी गाडीतून उतरून पळाल्याने ती वाचली, मात्र तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
गंभीर जखमी झालेल्या या तरुणीला पौड पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार संतोष दावलकर आणि दीपक पालके यांनी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केल्याने ती वाचली. याप्रकरणी संशयित आरोपी विनायक सूर्यवंशी (रा. थेरगाव, पुणे) याला पौड पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक सूर्यवंशी आणि जखमी तरुणी हे दोघे पुण्यात एकत्र कामाला होते. तिथे दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांचे एकमेकांवर प्रेम जडलं. यानंतर कामानिमित्त ही तरुणी मुंबईला गेली होती. विनायक तिला शनिवारी १३ एप्रिल रोजी रात्री पुण्याला घेऊन निघाला.
रविवारी पहाटे लोणावळा येथे चाकूने भोसकून मानेवर, छातीवर, खांद्यावर, पोटात सपासप वार करत तिला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत तो तिला दिवसभर गाडीत फिरवत होता. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पौडजवळील सिंबायोसिस कॉलेजजवळ विनायकने गाडी थांबवली. त्यावेळी तरुणीने गाडीतून पळ काढला. त्यानंतर प्रियकरानेही गाडीतून फरार झाला. पुढे काही अंतरावर जाऊन गरोदर प्रेयसी बेशुद्ध पडली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला पोलिस हवालदार संतोष दावलकर आणि दीपक पालके यांनी ससून रूग्णालयात दाखल केले. दरम्यान या तरुणीच्या पोटात असलेले बाळ पोटातच मरण पावले. जखमी तरुणी शुद्धीवर आल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा पौड पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली. ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याचा पौड पोलिस तपास करत आहेत.