लोणी काळभोर: मागील 20 दिवसांपासून अज्ञान ड्रोनने पुणे जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. बारामती, इंदापूर, दौंड आणि हवेली तालुक्यात अनेक ड्रोन नागरिकांच्या घरावर घिरट्या घालातानाचे व्हिडीओ कित्येक जणांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केले आहेत. तसेच या ड्रोनच्या माध्यमातून घरांची रेकी करून चोऱ्या केल्या जात असल्याचा चर्चा नागरिकांमध्ये चांगल्याच रंगत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पूर्व हवेलीतील मांजरी बुद्रुक, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, उरुळी कांचन, टिळेकरवाडी, भवरापूर, खामगाव टेक, अष्टापूर व परिसरात रात्री दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात ड्रोन फिरताना नागरिकांनी पाहिले आहेत. लाल, हिरव्या व पांढऱ्या रंगाच्या छोट्या लाईटस या ड्रोनमध्ये आहेत. मात्र, ड्रोनचा पाठलाग केल्यानंतर हे काही वेळानंतर गायब होत आहेत.
पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी उडणाऱ्या ड्रोनचा धसका घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर आणि व्हाट्सॲप ग्रुपवर रात्री अपरात्री फिरणाऱ्या ड्रोनचीच भीतीयुक्त चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक गावांत घरांवरुन घिरट्या मारणारे नक्की ड्रोन आहेत की इतर काही, याबाबत अनेक चर्चांना आता उधाण आले आहे.
पूर्व हवेलीतील मांजरी बुद्रुक, थेऊर, कुंजीरवाडी परिसरात मंगळवारी (ता.4) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ड्रोन आकाशात घिरट्या मारताना अनेक नागरिकांना आढळून आले. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पण, पोलिस येईपर्यंत ड्रोन गायब झाले होते. गेले काही दिवस अज्ञात ड्रोन दररोज रात्री उडताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच चोरटे चोरी करण्यासाठी नक्की ड्रोन कॅमेराचा वापर करतात का? तसेच एकदाच एवढे ड्रोन चार तालुक्यातील अनेक गावात कसे फिरत असतील? एवढे ड्रोन कसे सक्रीय आहेत ? अशा अनेक चर्चा नागरिकांमध्ये रंगल्या आहेत.
दरम्यान, आकाशात फिरणाऱ्या अज्ञात ड्रोन संदर्भात नागरिकांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन आमदार कुल यांनी रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या अज्ञात ड्रोनची चौकशी करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे व जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या निवेदनाची दखल घेऊन, पुणे ग्रामीण पोलीसांनी मुंबईहून एक तांत्रिक विशेषतज्ञांची टीम यवतला पाठवली आहे.
ड्रोनचे गूढ अद्यापही कायम
पुणे जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास ड्रोन फिरत आहेत. मात्र हे ड्रोन कोणाचे आहेत, कशासाठी ते उडविले जात आहेत, याची ना पोलिसांना माहिती आहे, ना इतर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला, त्यामुळे या मागील गूढ अद्यापही कायम आहे. ड्रोनचे गूढ न उलघडल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार व मंगळवार असे दोन दिवस तांत्रिक विशेषतज्ञांची टीम तळ ठोकून ड्रोन पकडण्याच्या तयारीत होती. मात्र, आकाशात अज्ञात ड्रोन उडालेच नाहीत. तांत्रिक विशेषतज्ञांच्या टीमने ड्रोन व विमान यांमधील फरक सांगून नागरिकांचे समुपदेश केले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त वाढविले आहेत. नागरिकांना आकाशात ड्रोन फिरतानाचे आढळून आल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क करावा. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
– नारायण देशमुख (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यवत पोलीस ठाणे)