शिरुर : तालुक्यात मागील दोन दिवसांच्या आसपास रात्री एकाच वेळी चार ते पाच ड्रोन घिरट्या घालत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलिस किंवा प्रशासकीय यंत्रणेकडून कोणताही खुलासा झालेला नाही. परिणामी आता रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी, घोलपवाडी, टाकळी भीमा, करांजावणे, इंगळेनगर, दहिवडी या गावांवर रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. काही वेळ घिरट्या घालून हे ड्रोन गायब होत असल्याचा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात या ड्रोनच्या घिरट्यांचे प्रकार वाढले आहेत. वाडी, वस्ती, एकांतातील घर यावर जास्त प्रमाणात फेऱ्या मारत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये वेगवेगळे संभ्रम, व चर्चांना उधाण आले आहे.
याआधी पुणे ग्रामीण च्या पूर्व भागात मागील काही दिवसांत पाच ते सहा ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. तत्पूर्वी अज्ञात ड्रोन फिरत होते असं इथल्या स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे. रात्रीच्या वेळीच हे ड्रोन फिरत असल्यामुळे ग्रामस्थांनी आता रात्र गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. ड्रोन दिसल्यानंतर अनेकदा पोलिसांना माहिती दिली जाते. परंतु पोलिस पोहोचेपर्यंत ड्रोन गायब होत असल्याचे प्रकारही घडत आहेत.
केवळ शिरूर तालुक्यातच नव्हे तर आसपासच्या अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. याबाबत स्थानिकांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रारीही केल्या आहेत. मात्र पोलिस अथवा प्रशासकीय यंत्रणेकडून याबाबत कसलाही खुलासा झालेला नाही. हे ड्रोन नेमके कोण फिरवत आहे याचाही आजवर शोध लागलेला नाही.
आजवर अनेक ठिकाणी ड्रोन फिरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत काहीच कारवाई होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे ड्रोन फिरत असल्याच्या घटनांबाबत प्रशासनाकडून सध्या तरी बघ्याचीच भूमिका घेतली गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.