केडगाव: दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये काही दिवसापासून ड्रोन कॅमेरे घिरट्या घालत आहेत. याचे सत्र अद्याप सुरूच आहे. ड्रोनचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश येत आहे. हे ड्रोन कॅमेरे पोलिसांना एक खुले आव्हान देत आहेत. ड्रोनचा हा नेमका काय प्रकार आहे? याचा उलगडा मात्र होत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून माञ अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. ग्रामीण भागात जसे ड्रोन कॅमेरे घिरट्या घालू लागले आहेत, तसे चोरीचे प्रमाण देखील वाढले असल्याचे सर्वसामान्य नागरिक बोलत आहेत. स्थानिक पोलिस प्रशासनाकडून अद्याप या ड्रोन कॅमेऱ्यांचा छडा का लागत नाही? असा प्रश्न जनतेसमोर पडला आहे. पाटस, खोर, वरवंड, चौफुला, बिरोबाची वाडी, खुटबाव, देलवडी या परिसरात आता एक नव्हे, तर चार ड्रोन कॅमेरे हवेत फिरताना दिसत आहेत. रोज रात्री या घिरट्याचे सत्र सुरूच आहेत. तरुण वर्ग सतर्क होऊन त्यांनी या कॅमेऱ्याचे व्हिडिओ शूटिंग देखील सोशल मीडियाच्या माध्यमातुन प्रसारित केले आहे.
ज्या वेळी तरुण हे कॅमेरे पाहण्यासाठी एकत्र येतात, त्या वेळी हे कॅमेरे आणखी उंचावर नेले जातात. जेणे करून विमान असल्याचा भास व्हावा, असे मत तरुण वर्गाचे आहे. परंतु, हे ड्रोन कॅमेरे आहेत की विमान? यांचा पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर छडा लावला पाहिजे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे, असे मत नागरिक मांडत आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांना या ड्रोन कॅमेऱ्यांबाबत समजताच त्यांनी ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना संपर्क करून या ड्रोन कॅमेरा मागे काय रहस्य आहे ? घरफोडी व चोऱ्या करणाऱ्या गुंडांकडून याचा वापर केला जात आहे का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ड्रोन कॅमेऱ्याबाबत तपास सुरु आहे. लवकरच यामागे असणाऱ्यांना शोधून काढले जाईल.नागरिकांनी सतर्क राहून, याबाबत आम्हाला संपर्क साधावा. जेणेकरून संशयित ड्रोनवर दुसऱ्या ड्रोनद्वारे हल्ला करून त्याला खाली पाडले जाईल. त्यामधील असलेल्या डाटाच्या आधारे पुढील गोपनीय माहिती समोर येईल.
-नारायण देशमुख – पोलिस निरीक्षक (यवत )