हडपसर : हडपसर परिसरात किरकोळ अपघातानंतर नुकसान भरपाई मागण्यास गेलेल्या दुचाकी चालकाच्या खूनप्रकरणात पसार झालेल्या ६ जणांना अखेर हडपसर पोलिसांनी अटक केली. केवळ दुचाकी घासल्याच्या कारणावरून हा वाद झाला होता. वादानंतर चालक त्याच्या नातेवाईकांसोबत आरोपीकडे नुकसान भरपाई मागण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता.

याप्ररकरणी विलास सुरेश सकट (वय ३८), कैलास सुरेश सकट (वय २०), प्रमोद ज्ञानेश्वर राखपसरे (वय १९), प्रशांत ज्ञानेश्वर राखपसरे (वय २१), सचिन संजय सकट (वय २९) व ज्ञानेश्वर प्रभू राखपसरे (वय ७८) यांना अटक करण्यात आले आहे. या घटनेत अभिषेक संजय भोसले (वय ३०) याचा खून झाला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, सहाय्यक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे व त्यांच्या पथकाने केली. याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अभिषेक भोसले यांच्या मोटारीचा धक्का लागल्याने आरोपी विलास सकट याच्याशी वाद झाला. भोसले आणि त्यांचा भाचा अथर्व मोटारीतून फुरसुंगी-चंदवाडी रस्त्यावरुन मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास निघाले होते. आरोपी सकट आणि साथीदारांनी मोटारचालक भोसले आणि अथर्व याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी भोसले यांच्यावर शस्त्राने वार केले. अथर्वने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. आरोपी तेथून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या भोसले यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. फुरसुंगी ते चंदवाडी रोड रस्त्यावर मंगळवारी रात्री हा हत्येचा थरार पाहायला मिळाला. खूनानंतर आरोपी पसार झाले होते.
दरम्यान, पुण्यात दुचाकी घासल्यानंतर वाद आणि वादानंतर भरपाई मागितली म्हणून खून झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. हडपसर पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेण्यात येत होता. मात्र, आरोपी गेल्या सात दिवसांपासून पसार होते. दरम्यान, आरोपी हे बारामती व वाघोली परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने त्यांना दोन्ही ठिकाणांवरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव हे करीत आहेत.







