पुणे : पुणे-बंगळुरु महामार्गावर दोन कंटेनर्सचा भीषण अपघात झाला आहे. यावेळी मागील बाजूस असणाऱ्या कंटेनरमधील वाहनचालक जखमी अवस्थेत गाडीच्या केबिनमध्ये अडकून पडला होता. त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पुणे-बेंगळुरू महामार्गावर जांभूळवाडी दरी पुलाच्या अलीकडे हा अपघात झाला. एका मोठ्या कंटेनरला (RJ 19 GG 0083) मागील बाजूने येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरने (MH 12 MV 8256) जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच, नवले अग्निशमन केंद्र तसेच मुख्यालयातून व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून बचाव पथकातील व्हॅन रवाना करण्यात आल्या. जखमी वाहनचालकास बाहेर काढून त्याला उपचारासाठी रवाना करण्यात आलं. त्यानंतर गाडीत इतर कोणी नसल्याची खात्री करण्यात आली. अपघातात जखमी झालेल्या वाहनचालकाचं नाव रावसाहेब पिंगारे आहे.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.