पुणे : चुकीच्या पद्धतीने डाव्या बाजूने बसला ओव्हरटेक करत असताना बस घासल्याच्या कारणावरुन दुचाकीस्वाराने पीएमपी बस चालक व वाहकांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना लोहगावमधील धानोरी जकातनाका येथे शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत बस वाहक गोविंद त्रिंबक मिसाळ (वय ४०, रा. वाघोली) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपी बसवाहक आहेत. ते बस पुणे स्टेशनकडे घेऊन जात असताना एक दुचाकीस्वार डाव्या बाजूने बसला ओव्हरटेक करुन जात होता. त्यावेळी तो बसला घासला गेला. त्याने बसला दुचाकी आडवी लावली. बसचालकाला शिवीगाळ करत ‘गाडी वाकडी का घातली, तुम्हाला घोडाच लावतो’, अशी धमकी देऊन फिर्यादीची कॉलर पकडून त्यांना व बसचालकाला बेदम मारहाण केली.
याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शेवाळे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.