लोणी काळभोर (पुणे): आयुष औषधाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील श्री.श्री. क्लिनिकचे मुख्य संचालक डॉ. विश्वजीत नागनाथ देशमुख यांना आयुष पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. डॉ. देशमुख यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शिर्डी येथील पुष्पक रिसॉर्टमध्ये नुकताच पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात डॉ. विश्वजीत देशमुख यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी उपसंचालक डॉ. प्रवीण जोशी, अभिनेते देवदत्त नागे, प्रशिक्षण अधिकारी प्रणव पांड्या, टीव्ही अभिनेत्री ऋतुजा वाघवे, सुयोग गोर्डे, आणि कलर टीव्ही मराठीचे कार्यकारी निर्माते शांतनू बोरकर, अध्यक्ष डॉ. सतीश कराळे, उपाध्यक्ष नितीनराजे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आणि आयुष ग्लोबल मेडिकल असोसिएशन विस्तार केंद्र – राजकोट, एम्एसएमइ मंत्रालय व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आयुष ग्लोबल पुरस्कार”२०२३ चे आयोजन करण्यात आला होते. डॉ. देशमुख यांनी वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल योगदान देऊन समाजातील दुर्बल घटकांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दाखल घेऊन आयुष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले की, मी केलेल्या कार्याची पोच पावती म्हणून मला पुरस्कार मिळाला आहे. यामुळे मला खूप आनंद झाला आहे. तसेच या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. आणि ती मी रुग्णांची सेवा करून यशस्वी पार पाडणार आहे