पुणे : शिबलापूर येथील व्यसनमुक्तीवर कार्य करणारे डॉ. सोमनाथ गिते यांना “राज्यस्तरीय समाजरत्न” पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे.
पुणे येथील राज्यस्तरीय सामाजिक काम करणारी संस्था म्हणून ओळख असणाऱ्या स्वप्नल फाऊंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (पुणे) येथे ‘राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२४’ नुकताच पार पडला. या सोहळ्यात डॉ. सोमनाथ गिते यांना “राज्यस्तरीय समाजरत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक डॉ. राजाराम धोंडकर, लोकमान्य वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. रजनी इंदुलकर, निवृत्त जिल्हा न्यायाधीश रवींद्र कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे स्वीय सहाय्यक सुनील हुरेरकर, माईंड पॉवर ट्रेनर दत्ता कोहिनकर, नगरसेविका रेखा खोपकर, सवाई मसालेच्या संचालिका रुपाली जाधव, एक्स टेलर पौर्णिमा राऊत, अभिनेत्री तेजस्विनी पायगुडे, आनंद पिपळकर, डॉ. राजेंद्र भवाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राजाराम धोंडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्वप्नल फाऊंडेशनच्या संचालिका शोभाताई बल्लाळ यांनी केले. वंदना साळोखे यांच्या चौघडा वादनाने सर्व मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. कुमारी अंजली आखाडे (नृत्यांगना) हिने नृत्याने सर्वांची मने जिंकली. शिवांगी आखाडे हिने बैरागी रगतिल शिव स्तुती सादर केली. वंदनाताईंनी चौघडा सनईचे अप्रतिम सादरीकरण केले.
डॉ. अमित मोहिते ऊर्फ आम्रपाली यांनी तृतीयापंथीयांविषयी लोकांची मने कशी आहेत, ते बदलण्यासाठी काय करावे हे सांगितले. अपर्णा काळे यांनी अतिशय सुरेख संगीत सादर केले. सवाई मसालातर्फे प्रत्येक पुरस्कार विजेत्याला सवाई मसाला संच भेट देण्यात आला. या कार्यक्रमात कृषीरत्न, सेवारत्न, आरोग्यरत्न, युवारत्न, नारीरत्न, उद्गाररत्न, लोकगौरव, बालगौरव, उत्कृष्ट खेळाडू, आदर्श सरपंच, लोकसेवा, आदर्श माता, आरोग्य सेवा, पत्रकार आदी ७१ जणांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.