बापू मुळीक / सासवड : जेजुरी (ता. पुरंदर) येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालय यांचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. शिवाजी ज्ञानदेव भिंताडे यांनी नाशिक येथे झालेल्या पाचव्या महाराष्ट्र राज्य मास्टर गेम 2024 मध्ये वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारातील 73 किलो वजनी गटातून तसेच पावर लिफ्टिंग मधील 74 किलो वजनी गटातून सुवर्णपदक मिळवले. त्यांची निवड ही ओडिसा येथे होणाऱ्या मास्टर गेम्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.
तसेच श्रीरामपूर येथे झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर विभागीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाची तृतीय वर्ष कला विद्या शाखेतील विद्यार्थिनी, 52 किलो वजन गटात सिद्धी काळाने हिने सुवर्णपदक पटकावले.
सिद्धीला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. शिवाजी भिंताडे यांचे मार्गदर्शन लाभले. आचार्य विकास प्रतिष्ठानचे पुरंदरचे अध्यक्ष विजय कोलते, सचिव शांताराम पोमण, सहसचिव शिवाजी घोगरे, बंडू काका जगताप, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी नागणे, उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते आदीनी या दोघांचे कौतुक केले.