पुणे : पुणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी शनिवार 16 मार्च रोजी आयुक्तपदाचा पदभार मावळते आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून स्वीकारला. यावेळी कुमार यांनी भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच डॉ. भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून खातेनिहाय महानगरपालिकेच्या कामकाजाबाबतचा आढावा घेतला. यामध्ये त्यांनी पुणे शहरातील नागरिकांच्या गरज ओळखून त्यानुसार सर्व अधिकारी वर्गाने काम करावे असे निर्देश देखील दिले आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, डॉ. कुणाल खेमणार यांच्यासह सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
त्यानंतर नवनियुक्त महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर पालिका प्रशासनाकडून भर दिला जाणार आहे. माझ्या कार्यकाळात नागरिक हा प्रशासनाचा केंद्रबिंदू असेल, असंही डॉ. भोसले यांनी सांगितले.