‘टांगा पलटी केल्याशिवाय थांबायच नाही’ ; खासदार डॉ. अमोल कोल्हे
युनुस तांबोळी
शिरूर, ता. १९ : राज्यात सर्वसामान्य जनते बरोबर शेतकरी, कामगारांचे प्रश्न महत्वाचे आहे. महागाई, तरूणांची बेरोजगारी, दळणवळण, बिबट, रस्ते, विज, बाजारभाव यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार सतत झटत असतात. त्यासाठी एकजुटीने विकासाच्या नावाखाली पक्ष सोडून जाणाऱ्यांचा ‘टांगा पलटी केल्याशिवाय थांबायच नाही’ असे आवाहन शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले
कवठे येमाई (ता. शिरूर) येथील बालाजी मंगल कार्यालयात ४२ गावांच्या शरद पवार गटाचा राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोल्हे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते माजी आमदार जगन्नाथ शेवाळे होते. यावेळी राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, निवृत्त अधिकारी प्रभाकर गावडे, पंचायत समितीचे माजी सदस्या अरूणा घोडे, माजी सरपंच दामुशेठ घोडे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली ढोमे, उत्तम गवारी, शरद बोंबे, बाळशिराम ढोमे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यापुढे बोलताना कोल्हे म्हणाले, “या भागात कोट्यावधी रूपयांचा निधी आणण्यात यशस्वी झालो आहे. सध्या इंद्रायणी सिटी प्रकल्पाने हजारो तरूणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. पुणे नाशीक रेल्वे मुळे आपल्या भागाची प्रगती होणार आहे.
माजी आमदार शेवाळे म्हणाले की, राज्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी संघटना बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्रीत आले पाहिजे. कारण परीवर्तनाचा चेहरा म्हणजे राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत. शिरूर तालुक्यात संपन्नता येण्यासाठी त्यांनी विकासाची कामे केली आहेत. विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास करून घेतला. विकास कामे केले त्यांनी स्वतःची ची जहागिरदारी विकून दिली नाही. राज्याच्या तिजोरीत जो आपला पैसा होता त्यातून विकास कामे घडून आणली. अशा स्वार्थी राजकारण्यांना व गद्दारांना चले जाव करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सगळ्यांनी एकवटले पाहिजे.
पाचुंदकर म्हणाले की, शिरूर तालुक्यातील राजकारण हे बिहार असल्याचे वाटत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वामुळे व त्यांच्या विचारामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी हा चारचाकी वाहनांमधून फिरू लागला आहे. शिरूर तालुक्यातील ६० ते ७० टक्के ऊस भिमाशंकर साखर कारखान्याला घातला जातो. ४२ गावातून या कारखान्याला भाग निधी म्हणून करोडो रुपये घेतले आहे. तरी देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखाना सभासद करून घेत नाही.
निकम म्हणाले की, राजकारण हे राजकारणाच्या जागेवर असते. विकासाच्या नावाखाली राजकारण करणे योग्य नाही. पण पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनी खरच शेतकऱ्यांचा विकास केला का? हा अभ्यासाचा भाग आहे.