इंदापूर : गाईच्या दुधाला 40 रुपये हमीभाव मिळवण्यासाठी व आपल्या घामाचे पैकं भीक म्हणून नव्हे तर हक्काने घेण्यासाठी इंदापूर येथे शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने नगरपरिषदेच्या प्रांगणात (दि.16) जुलै रोजी दूध परिषदेचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमा दरम्यान बोलताना दीपक काटे म्हणाले की, दुधाला हमी भाव मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा द्यावा लागत आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. समाजातील सर्व घटकांमध्ये युती आहे. संघटित शक्ती आहे. फक्त शेतकरी मात्र संघटित होत नाही. यामुळे त्यांच्या बाजूने निर्णय होत नाहीत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदानाचे गाजर नको तर हमीभाव देण्यात यावा.
यावेळी बोलताना डॉ. अजित नवले म्हणाले की, दुधाला पाच रुपये जाहीर केलेले अनुदान खूपच कमी म्हणजे फक्त पाच दहा टक्के लोकांनाच याचे पैसे मिळाले. त्यामुळे अनुदानाबद्दल मोठा असंतोष शेतकऱ्यांमध्ये आहे. दुधाला प्रति लिटर 30 रुपये सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना द्यावेत, अशा प्रकारची मागणी केली आहे. मात्र तशा पद्धतीचे बंधन लादण्याचा कायदा नसल्याने व सरकारला तसा अधिकार नसल्यामुळे शेतकऱ्यांना याचा देखील लाभ मिळत नाही.
त्यामुळे सरकारने अनुदानाचा आदेश या पलीकडे जाऊन चाळीस रुपये प्रति लिटर द्यावा, यासाठी संबंध महाराष्ट्रभर आंदोलने सुरू आहेत. 74 टक्के दूध हे खाजगी दूध संघात संकलित होते. त्यामुळे दुधाचा वारंवार प्रश्न निर्माण होतो. शेतकरी संघटना व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती दुधाला एफआरपी लागू करण्याची मागणी करत आहेत. ऊसाला ज्याप्रमाणे एफआरपी लागू होते. तसेच दुधाला देखील एफआरपी लागू होऊ शकते. अशा युक्तिवादावर दूध नाशवंत असल्याचे कारण दिले जाते. दुधाची 40 टन पावडर तयार होते. पावडर तयार झाल्यावर ती नाशवंत राहत नाही.
दूध परिषदेच्या दरम्यान बोलताना प्रकाश कुतवळ म्हणाले की, शेतकरी आणि दूध संस्था या एका गाडीची दोन चाके आहेत. सध्या राज्यातील दुधाच्या दर्जाबाबत बदनामी करून परराज्यातील दूध राज्यात आणले जात आहे. याचाही फटका बसत असून दुधाची भेसळ बाजूला काढण्यासाठी जनावरांना इअर टँगिग करणे गरजेचे आहे.