बारामती : राज्यात ग्रामपंचायतींमध्ये अनेक महिला आरक्षणामुळे सरपंचपदावर आरूढ झाल्या. परंतु डोर्लेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीत महिला सरपंचांच्या कारभारात पतींचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. सरकारने हे रोखण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला असला तरीही ग्रामपंचायतींचा कारभार पती चालवत असल्याचे चित्र सध्या डोर्लेवाडीत सुरु आहे.
महिला सरपंचांच्या कामात त्यांचे पती सर्वत्र सर्रासपणे लूडबूड करताना दिसतात. पण, यापुढे त्यांच्या कामात त्यांचे पती अथवा इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप चालणार नाही. शिवाय, संबंधित पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्या नातेवाईकांना बसताही येणार नाही, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. तरीही आजही डोर्लेवाडी येथे महिला सरपंचांच्या अधिकारावर गदा आणून पतिदेवचा राजरोसपणे हस्तक्षेप सुरु आहे.
डोर्लेवाडीत ‘महिला सरपंच नावाला आणि पतीदेव गावाच्या कारभाराला’ अशी परिस्थिती सध्या ग्रामपंचायतीत सुरु आहे. बायको सरपंच आहे, पण जणू काही सगळे अधिकार आपल्यालाच आहेत, असा यांचा ‘ऑरा’ सरपंचाचे पती करत आहेत. ग्रामसभेत आसनस्थ होऊन आपणच गावचे कर्ते करविते असल्याचा थाटात राजकारण करतात. पंचायतीतील कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे, वाढीव बोलणे, बारीक बारीक चुका काढून टोमणे मारणे या त्रासाला व टोमण्यांना कंटाळून कामगारांनी कामाला येण्यासाठी टाळाटाळ करू लागले आहेत.
विशेष म्हणजे ग्रामसेवकांनी सरपंच यांच्या पती यांना समज देणे गरजे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. कर्मचाऱ्याना उद्धट वागणूक देत असताना ग्रामसेवक यांच्याकडून कोणताही विरोध करण्यात आला नाही. त्यामुळे यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी गावकरी करू लागले आहेत. त्यामुळे याकडे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लक्ष देतील का असा सवाल येथील नागरिक विचारू लागले आहेत.
नातेवाईकांनी कामात हस्तक्षेप करणे चुकीचे
लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या महिला सरपंच, सदस्य यांच्या कामकाजात नातेवाईकांनी हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. सरपंच आणि सदस्यांच्या नातेवाईकांचा ग्रामपंचायत कारभारात होणार हस्तक्षेप मोडीत काढण्यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलून जे दोषी आढळतील त्याच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. तरच महिला सरपंच, सदस्य स्वतंत्ररित्या प्रभावी काम करू शकतील, अशी मागणी नाव न छापण्याच्या अटीवर काही नागरिकांनी सांगितली. तसेच ग्रामविकास अधिकारी रामचंद्र कारंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, सरपंचांचा त्याच्या गावांत वेगळाच तोरा असतो. एक वेगळाच सन्मान असतो. मात्र, महिला सरपंच असल्यास कामकाजामध्ये बऱ्याचदा त्यांच्या पतीचा अथवा इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप कायम असतो. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये नातेवाईकांनी मुळीच बसता कामा नये, असेही सरकारी आदेशात म्हटले आहे.