पुणे : पुण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मर्सिडिस बेन्झ कार भरधाव चालविताना जाणिवपूर्वक कुत्र्याच्या अंगावर गाडी घालून त्याला चिरडून ठार मारल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार स्वारगेट येथील पोर्णिमा टॉवरजवळील इव्हाज ग्रेस हॉटेलसमोर रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पद्मिनी पिटर स्टंप (वय-६५, रा. भवानी पेठ) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कारचालक सचिन कटारिया यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण पवार यांचा पाळीव कुत्रा डॉगी होता. पोर्णिमा टॉवर मध्ये सचिन कटारिया यांचे कार्यालय आहे. त्यांच्या मर्सिडिस बेन्झ या गाडीवरील चालकाने जाणिव पूर्वक कुत्र्याच्या अंगावर गाडी घालून त्याला चिरडले. यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबिकर करीत आहेत.