भोर : आंबाडे-कोळेवाडी (ता. भोर) येथे शेतकऱ्याच्या दारासमोरील कुत्र्याला बिबट्याने अर्धा किमी अंतर पळवून नेत फडशा पाडला. विसगाव खोरे परिसरातील नेरे, वरवडी, पाले, बालवडी येथील जंगल भागात मागील दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शेतीकामाला जाण्यासाठी नागरिक धजावत नाहीत. परिणामी, नागरिकांची शेतीकामे रखडलेली असल्याचे चित्र आहे. डोंगर भागाच्या शेजारी असलेल्या खासगी शेतांमध्ये पाळीव जनावरे चारण्यासाठी घेऊन जाणाऱ्या गुराख्यांनादेखील बिबट्याच्या भीतीने धडकी भरली आहे.
वन विभागाने तत्काळ बिबट्याचा माग काढून बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रात्री-अपरात्री घरातील कामांवर जाणारे लोक येत असतात. बिबट्याची भीती असल्याने घरातील माणूस घरी येईपर्यंत जीव टांगणीला लागत आहे.
दरम्यान, वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत म्हणाले की, गावाशेजारील परिसरात अथवा डोंगर भागात बिबट्या आढळल्यास नागरिकांनी वन विभागाला ताबडतोब माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.