अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : इंडियन मेडिकल असोसिएशनने १७ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या देशव्यापी वैद्यकीय सेवा बंदमध्ये शिरुर येथील डॉक्टर सहभागी होणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिशन शिरुरचे अध्यक्ष डॉ. राहुलदत्त पाटील व सचिव डॉ. स्वप्नील भालेराव यांनी दिली आहे. यासंदर्भात शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ९ ऑगस्ट रोजी कोलकत्ता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या अत्यंत निंदनीय घटनेमुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. या घटनेत एका तरुणी डॉक्टरवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतरच्या काळात या प्रकरणातील अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणे वागणूक दिली आणि तपासातही निष्काळजीपणा दाखविला.
तसेच स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी आंदोलक विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न, तसेच रुग्णालयातील विविध विभागांची तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवार (दि.१७) रोजी निषेध दिन पाळून सकाळी ६ वाजेपासून १८ ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांसाठी देशव्यापी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या बंदमध्ये सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, परंतु नियमित ओपीडी आणि तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत. या माध्यमातून वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी न्याय मागण्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करीत आहोत.