हडपसर (Pune): सातववाडी येथे ट्रक्टर-दुचाकीच्या अपघातात प्रजापिता ब्रम्हा कुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयातील केंद्रातील राजयोगी डॉ. बी. के. ईश्वर साहू यांचा मृत्यू झाला. ते २५ वर्षाचे होते. हा अपघात सोमवारी (दि. २१) सकाळी हडपसर-सासवड रस्त्यावर सातववाडी एसटी महामंडळाच्या बस थांब्याजवळ झाला. त्यांचा मृतदेह सातववाडी केंद्रावर अंतिम दर्शनासाठी दुपारी ठेवण्यात आला होता. त्यानंतर अंतिम संस्कारासाठी मृतदेह छतीसगडला रवाना करण्यात आला.
डॉ. साहू सासवड-हडपसर रस्त्याने भेकराईनगरकडून मगरपट्टा सिटीकडे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरची डॉ. साहू यांना धडक बसली. या अपघातात डॉ. दुचाकीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. त्यांच्या डोक्यातील हेल्मेटचाही चुराडा झाला. डॉ.साहू यांच्या पश्चात आई, एक भाऊ व विवाहित बहिण असा परिवार आहे.
मूळचे छत्तीसगड येथील डॉ. साहू आयुर्वेदाचार्य (बीएएमएस) मधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयुर्वेद शिक्षणाचा पुढील अभ्यास व अनुभवासाठी हडपसर, पुणे येथे वास्तव्यास होते. सुमारे दहा वर्षांपासून ईश्वरीय ज्ञानात असलेले डॉ. साहू यांनी हडपसर येथील वास्तव्य काळात ब्रम्हाकुमारीजच्या अध्यात्म प्रचारद्वारा सेवा कार्यास वाहून घेतले होते. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.