पुणे : महापालिकेच्या विविध विभागातील पंचेचाळीस वर्षांवरील कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकण्यात येऊ नये, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
महापालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या ३०० कंत्राटी सुरक्षा रक्षकांना वयाचे कारण पुढे करून कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले होते.
महापालिकेच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शवित आंदोलन केले होते. तसेच आमदार चेतन तुपे यांनी हा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनातही उपस्थित केला होता. तर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी सुरक्षा रक्षकांकडून उपोषण सुरू करण्यात आले होते.
दरम्यान, त्याची दखल घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकू नये, असे आदेश दिले आहेत. मात्र आता या निर्णयामुळे कंत्राटी सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाला असून कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या उपोषणालाही यश मिळाले आहे.