पुणे : अयोध्येत २२ जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात लाखो हात सोहळ्याच्या तयारीला लागले आहेत. पुणेकर देखील या मोहिमेत आघाडीवर आहेत. ‘दो धागे श्री राम के लिए’ या उपक्रमाअंतर्गत तब्बल ७ लाख पुणेकरांच्या सहभागातून प्रभू श्रीरामासाठी पुण्यात वस्त्र विणण्यात येत आहे. सौदामिनी हँडलूमच्या अनघा घैसास यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. २२ डिसेंबरपर्यंत हा आकडा १२ लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज अनघा घैसास यांनी व्यक्त केला.
रामलल्लासाठी वस्त्र विणण्यासाठी हातमाग कारागिर पुण्यात दाखल झाले आहेत. मात्र, रामलल्लाच्या सेवाकार्यात पुणेकरांचा खारीचा वाटा असावा, वस्त्र विणण्याची संधी पुणेरी रामभक्तांना मिळावी, यासाठी अनघा घैसास यांनी हा उपक्रम पुणेकरांसाठी खुला केला. ‘दो धागे राम के लिए’ म्हणत अनेक पुणेकर उत्साहाने हे वस्त्र विणताना दिसत आहेत.
दरम्यान, यापूर्वी अनघा घैसास यांनी ‘दो धागे देश के नाम’, असा उपक्रम आयोजित केला होता. २०१९ मध्ये या उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पुणेकरांच्या सहभागातून शेला विणून तो मोदी यांना भेट म्हणून देण्यात आला होता. त्याचवेळी रामलल्लासाठी वस्त्र विणण्याची संकल्पना घैसास यांच्या डोक्यात आली. सध्या ‘दो धागे श्री राम के लिए’ या उपक्रमासाठी ९ हातमाग आणि काही कारागिर काम करत आहेत. रामलल्लाचे सात दिवसाचे सात रंग ठरलेले असतात. त्या-त्या दिवसासाठी वेगवेगळ्या रंगाचे तागे येथे विणण्यात येत आहेत. येत्या २२ डिसेंबरपर्यंत वस्त्र विणणार आहेत. लाखो पुणेकर सकाळी आठ वाजल्यापासून फर्ग्युसन रस्त्यावर वस्त्र विणण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग सर्वाधिक आहे. २२ डिसेंबरपर्यंत हा आकडा १२ लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज अनघा घैसास यांनी व्यक्त केला.
अनघा घैसास उपक्रमाविषयी बोलताना म्हणाल्या की, मला रामलल्लासाठी वस्त्र करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी भाग्याचे काम आहे. हे पुण्य वाटून घेण्याचा विचार मी केला, तेव्हा मला ‘दो धागे श्री राम के लिए’ उपक्रम सुचला. त्यानंतर सगळ्या पुणेकरांना आवाहन करण्यात आलं आणि आज लाखो पुणेकर उपक्रमाला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. मी आणि माझी मुलगी सौदामिनी घैसास या दोघींनी मिळून ही मोहिम उभी केली आहे.