पुणे : कर्नाटकमधील कुख्यात धर्मराज चडचंण (डीएमसी) टोळीचा म्होरक्या मड्डु उर्फ माडवालेय्या हिरेमठ आणि त्याच्या दोन साथीदारांना पर्वती पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ देशी बनावटीचे पिस्तुले २५ जिवंत काडतुसे, गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि ५ मोबाईल असा एकुण ११ लाख ९० हजार रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.
याप्रकरणी माडवालेय्या पंचय्या हिरेमठ (वय-३५, रा. एपीएमसी मार्केटजवळ, बंबलक्ष्मी, इंडी रोड, ता. जि. विजापूर, कर्नाटक. सध्या रा. इलेवन पार्क, पिसोळी, उंड्री), सोमलिंग गुरप्पा दर्गा (वय-२८, रा. एम. बी. पाटीलनगर, सोलापुर रोड, विजापुर. मुळ रा. जालगेरी, ता. जि. विजापुर) आणि प्रशांत गुरूसिध्दप्पा गोगी (वय-२७, रा. गल्ली नं. २, शिवशंभो नगर, कात्रज-कोंढवा रोड. मुळ रा. मु. पो. देवगत, जुन्या मस्जिदजवळ, ता. सुरपुर, जि. यादगीर, कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्रे, अग्नीशस्त्रे जप्त करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यामुळे पर्वती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना कुख्यात धर्मराज चडचंण (डीएमसी) टोळीच्या म्होरक्याबाबत माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे वपोनि गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकार्यांची ४ पथके तयार करून नगर रोड ते पर्वतीहद्दीपर्यंत सापळे रचले. संशयित हे लक्ष्मीनारायण टॉकीज जवळ आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं.
दरम्यान, पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला ३ देशी बनावटीचे पिस्तुल आणि २५ जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी शस्त्रांसह गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि ५ मोबाईल असा एकुण ११ लाख ९० हजार रूपयाचा ऐवज जप्त केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन पवार करत आहेत.