Loni Kalbhor: लोणी काळभोर : अंतःकरणाचा वेध घेणारे संगीत, लोकप्रिय भावगीत, नादस्वरूप अंभगवाणी अन् गवळणीच्या मंगलमय सुरांनी भारलेला सुरमयी दिवाळी संध्या कार्यक्रम संगीत रसिकांसाठी अनोखी पर्वणी ठरला. अवघे रसिक भक्तीरसात न्हावून निघाले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण हितासाठी एंजल हायस्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून सचिन अग्निहोत्री यांचे मौलिक मार्गदर्शन, संचालिका इराणी यांच्या सहकार्याने व प्राचार्या शमशाद कोतवाल यांच्या संकल्पनेतून ‘संगीत संध्या’ हा कार्यक्रम नुकताच शाळा परिसरात संपन्न झाला.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रख्यात गायक संगीतरत्न ज्ञानेश्वर पानसरे व ऋषिकेश पानसरे यांनी आपली गायन कला सादर केली. त्यांच्यासोबत महाराष्ट्र कला भूषण बंडोपंतजी पानसरे, तबला विशारद रेवनजी पालखे, पखवाज वादक आकाश तुपे, बुलबूल साथ संतोष खलसे, शहाजी कानगुडे, ललित सांगळे आदी कलाकार साथीला होते.
कार्यक्रमाची सुरुवात ‘राम कृष्ण हरी’च्या गजरात झाली. ऋषिकेश पानसरे यांनी ‘निघालो घेऊन दत्तांची पालखी’ या गाण्याने उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्यानंतर विशेष भक्तीगीते व अभंग सादर करण्यात आले. ‘कन्हैया रे, कन्हैया रे’ आणि ‘मुरलीवाले’ या गौळणींनी कार्यक्रमात विशेष छाप पाडली.
‘झाला शेवट हा गोड’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किर्ती खलाटे यांनी केले. कार्यक्रमाला लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, कदमवाकवस्तीचे सरपंच चितरंजन गायकवाड, माजी सरपंच गौरी गायकवाड, एंजल हायस्कूल सीबीएसइच्या प्राचार्य खुशबू सिंग व सर्व ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार बांधव यांची उपस्थिती लाभली.