विशाल कदम
लोणी काळभोर (Loni Kalbhor): लोणी काळभोरच्या विश्वराज हॉस्पिटलमधील रुग्ण दिवाळीतही आनंदी; हॉस्पिटलमध्येच अनेक कार्यक्रम आयोजित दिवाळीच्या सणातही आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळत नसते. त्यांना या कालावधीतही रुग्णांची सेवा करावी लागते. परंतु, त्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा, यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दीपावलीच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिवाळीनिमित्त हॉस्पिटलमध्ये रॅम्प वॉक, रांगोळी, नृत्य, गायन या कार्यक्रमांचे व सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दिया, मेहंदी, आकाश कंदील, पणती यांचे स्टॉल लावण्यात आले होते. डॉ. संतोष पवार, सुधीरचंद्र उत्तम, हर्षा पालवे, डॉ.सूर्यवंशी, शिवचरण गंधार, पल्लवी तेलेकर यांनी दीपप्रज्वलन केले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरवात झाली. यामध्ये नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता.
दिवाळी आनंदाचा सण हॉस्पिटलमध्ये काम करत असताना रुग्णांनाही थोडासा आनंद मिळावा म्हणून विविध विभागात सजावट करण्यात आली. रुग्णालयामध्ये दिवाळीनिमित्त सर्व वॉर्ड सजवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे वॉर्डांमध्ये रांगोळ्यासह रोषणाईही करण्यात आली. यामध्ये सर्वच कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही विश्वराज हॉस्पिटलमध्ये सकारात्मक उत्साह आणि उत्सव उजळताना पाहू शकता. दिवाळी साजरी करताना आनंदाने काम करणारे कर्मचारी पाहून तुम्हाला नक्कीच आनंद पाहिला मिळेल.
‘दिवाळीतही कुटुंब, सुख-दु:ख विसरून आम्ही रुग्णांची सेवा करत असतो. दसरा असो किंवा दिवाळी रुग्णांची प्रामाणिकपणे शुश्रूषा करतच आम्ही सणाचा आनंद घेतो. विश्वराज हॉस्पिटलमध्ये मी ७ वर्षांपासून परिचारिका म्हणून काम करत आहे. गेले काही दिवस घरातील तयारीही ड्युटीनंतर घरी आल्यावर करत होते. दिवाळीच्या दिवसातही ड्युटी असल्यामुळे दिवसा रुग्णसेवा करून रात्री घरच्यांसह दिवाळी साजरी करणार आहे.
– सपना चौधरी, परिचारिका, विश्वराज हॉस्पिटल