Diwali 2023 : पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये तब्बल ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सुरवातीला गृहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. तर शेंगदाणा तेलाचे दर टिकून आहेत.
परदेशातून सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आवक नियमित सुरू आहे. खाद्यतेलाची आयात वाढलेली आहे. इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थिती, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून गृहिणी बाजारपेठेतून तयार फराळाचे पदार्थ खरेदी करतात. कामाच्या व्याप सांभाळून फराळाचे पदार्थ तयार करणे गृहिणींना शक्य होत नाही. त्यामुळे तयार फराळाचे पदार्थ खरेदी करण्याकडे कल वाढला असून, दिवाळीत मिठाई विक्रेते, फराळ तयार करणाऱ्यांकडून खाद्यतेलांना मागणी वाढते. तर, घरगुती ग्राहकांकडून खाद्यतेलांना असलेल्या मागणीत घट होत चालली आहे.
खाद्यतेलांचे १५ किलोचे दर (कंसात गेल्या वर्षी दिवाळीतील दर) :
पाम : १३५० ते १५०० रुपये (२१०० ते २१५० रुपये)
सूर्यफूल : १४०० ते १५०० रुपये (२३०० ते २४०० रुपये)
सोयाबीन : १४०० ते १५०० रुपये (२३०० ते २४०० रुपये)
सरकी : १४०० ते १५५० रुपये (२२०० रुपये)
वनस्पती तूप : १४०० ते १६०० रुपये (१९०० ते २००० रुपये)
शेंगदाणा : २७०० ते २८०० रुपये (२८०० ते २९०० रुपये)