इंदापूर / दीपक खिलारे : लोकसभेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात येऊन ठेपल्या आहेत. त्या अनुषंगाने शनिवारी (दि.२४) इंदापूर येथील दूधगंगा येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या आयोजित बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत निर्णायक भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याने संपूर्ण राज्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या बैठकीला तालुक्यातील ज्येष्ठ व तरुण सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यकर्त्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील-ठाकरे व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून मार्गदर्शन करणार आहेत.
इंदापूर तालुक्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये मित्रपक्षाबद्दल प्रचंड रोष आहे. कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या लोकसभेला मित्रपक्षाचे काम करायचे नाही, असा कार्यकर्त्यांचा पक्ष नेतृत्वाकडे रेटा आहे. २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर याच कार्यकर्त्यांना विरोधी पक्षांच्या लोकांकडून प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.
गेल्या आठवड्यात पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील-ठाकरे व नीरा भीमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी इंदापूर मध्ये पत्रकार परिषद घेत या लोकांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे वक्तव्य करत मित्रपक्षातील नेत्यांना प्रतिआव्हान दिले होते.
दरम्यान, शनिवारी भाजप कार्यकर्त्यांची बैठक होणार असून, या बैठकीत लोकसभेच्या अनुषंगाने भूमिका स्पष्ट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.