दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत घरगुती ओल्या कचऱ्यावर होम कंपोस्टिंग करण्यासाठी महिलांना मॅजिक बास्केटचे वाटप करण्यात आले.
यामुळे इंदापूर शहरातून निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर शंभर टक्के शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून त्यापासून सेंद्रिय खत तयार होण्यास मदत होणार आहे.
नगरपरिषदेचे प्रशासक दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या हस्ते या मॅजिक बास्केट वाटप व सेंद्रिय खत विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी महिलांना घरगुती कचरा कसा तयार करावा व त्याचा वापर करून घरगुती भाजीपाला कसा लावावा याबाबत मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सेंद्रिय खतास वाढती मागणी…
इंदापूर नगरपरिषदेकडून ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या सेंद्रिय खतास नागरिकांकडून मागणी होत आहे. नगरपरिषदेच्या वतीने उभारलेल्या विक्री केंद्रातून पहिल्या दिवशी शंभर किलो खताची विक्री करण्यात आली. तसेच आणखी दीड टन सेंद्रिय खताची मागणी आली असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले.