पुणे : मुळशी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलोपार्जित जमीन विकून आलेल्या पैशांच्या वाटणीवरुन मोठ्या भावाने छोट्या भावाला भररस्त्यात बांबुने मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना कर्वेनगरमधील केयुर इलेक्ट्रॉनिक्सच्या समोर, वडाचा स्टॉप येथे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत ज्ञानेश्वर लक्ष्मण दिघे (वय ४६, रा. हॅप्पी कॉलनी, कोथरुड) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रामदास लक्ष्मण दिघे (वय ५१), लिला रामदास दिघे, शरद रामदास दिघे व मनोज रामदास दिघे (सर्व रा. मकवान चाळ, गोसावी वस्ती, कर्वेनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चालक म्हणून काम करतात. मुळशी तालुक्यातील भांबर्डे गावात वडिलोपार्जित जमीन होती. त्या जमिनीच्या विक्रीचा व्यवहार फिर्यादी यांनी केला होता. त्यातून आलेल्या पैशांची दोन्ही भावांना समान वाटणी करायची आहे. फिर्यादी हे १७ ऑक्टोंबरला रात्री ८ वाजता घरी असताना त्याचा पुतण्या शरद दिघे याने फोन करुन वडाचा बसस्टॉप येथे बोलावून घेतले. ते त्या ठिकाणी गेले असता तेथे त्यांचा मोठा भाऊ रामदास, वहिनी लिला, पुतण्या शरद उभे होते.
तेव्हा शरद याने आमच्या वाट्याचे पैसे कधी देणार अशी विचारणा केली. त्यावर फिर्यादी यांनी मी ते पैसे आईवडिलांच्या औषधोपचारासाठी खर्च केले आहेत. माझ्याकडे जसे पैसे येतील, तसे मी तुम्हाला देईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर शरद याने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचा लहान भाऊ मनोज हा पळत तेथे आला, त्यानेही मारहाण केली.
दरम्यान, शरद व मनोज याने रस्त्याच्या कडेला पडलेला लाकडी बांबु उचलून फिर्यादीच्या डोक्यात, डोळ्यावर, पाठीवर, पायावर मारल्याने ते रस्त्यात कोसळले. त्यांनी फिर्यादीचा मुलगा सोहमलाही बेदम मारहाण केली. फिर्यादीची पत्नी, मुलगी अनिशा यांनी येऊन त्यांना सोडविले. तेव्हा चौघे फिर्यादीजवळ आले. आमचे पैसे नाही दिले तर आम्ही कोणालाही सोडणार नाही़ सर्वांना मारुन टाकू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गांगुर्डे करीत आहेत.