लोणी काळभोर, ता.11: कलिंगडाच्या वजनावरून फळे विक्री करणाऱ्या कुटुंबाला शिवीगाळ करून लाठी-काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नायगाव फाटा चौक येथे सोमवारी (ता.7) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन येथील 5 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद प्रल्हाद जाधव, सुवर्णा आनंद जाधव, अमृता तानाजी जाधव, आनंद यांची आई व राणी (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा- चौधरी माथा, उरुळी कांचन ता- हवेली जि- पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मनिषा रामलिंग बोराडे (वय 30, रा. सोरतपावाडी, ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनिषा यांचे नायगाव चौक येथे मागील चार ते पाच वर्षांपासून फळे विक्रीचे दुकान आहे. फळे विक्री केल्यानंतर आलेल्या उत्पन्नातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. तर फिर्यादी या फ्रुटच्या दुकानावर विक्रीसाठी लागणारे फळे ही आनंद जाधव व त्यांचा भाऊ तानाजी जाधव यांच्याकडून खरेदी करत आहेत. त्यामुळे दोन्ही कुटुंबे ही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. फिर्यादी यांनी सोमवारी नेहमीप्रमाणे आनंद प्रल्हाद जाधव यांच्याकडुन फ्रुट स्टॉलवर विक्रीसाठी लागणारे कलिंगड खरेदी केले होते. कलिंगडाच्या वजनावरुन आनंद जाधव यांच्या सोबत किरकोळ स्वरुपाची बाचाबाची झाली होती. यावेळी फिर्यादी यांचा भाऊ बालाजी यांनी तानाजी यास फोन करुन विचारणा केली असता, तानाजीने बालाजीला शिवीगाळ केली.
याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी फिर्यादी व त्यांचे कुटुंब गेले असता, आरोपींनी दुकानातील फळांचे नुकसान केले असल्याचे समजले. त्यामुळे ते तक्रार न देता थेट दुकानावर माघारी गेले. तेव्हा घटनास्थळी आनंद जाधव, सुवर्णा जाधव, अमृता जाधव, राणी व आनंद याची आई हे होते. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी मनिषा, त्यांचे वडील बजरंग केशवराव सावंत (वय 51), आई अनिता (वय 46) व वहिणी शिवानी ( वय 21) यांना हाताने व काठीने मारहाण केली. तसेच तुमच्याकडे बघुन घेतो, तुम्हाला सोडणार नाही? अशी धमकी आरोपींनी दिली आहे. फिर्यादी यांच्या कुटुंबाला मारहाण चालू असताना मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी गावातील नागरिकांनी मध्यस्थी करून भांडणे सोडविली.
दरम्यान, या मारहाणीत फिर्यादी मनिषा, त्यांची आई अनिता व वहिनी शिवानी या जखमी झाल्या होत्या. उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतल्यानंतर फिर्यादी यांनी त्वरित लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. आणि आरोपींच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पाचही आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(1),115(2), 352, 351(2), 189(2), 191(2) व 190 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.