पुणे : शनिवारी (दि. २०) पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला खासदार शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, सुनील शेळके, सुनील कांबळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहिले. नियोजन समितीची ही बैठक वादळी ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यासमोरच अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
या बैठकीमध्ये बारामती आणि शिरुर लोकसभा क्षेत्रात विकास काम करण्यासाठी निधी दिला जात नाही, परंतु, दुसर्या बाजूला मावळसाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमकपणे मांडली. त्यानंतर, ताई आमच्या मतदारसंघाचा उल्लेख वारंवार का करता? ज्यावेळी बारामतीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळत होता, त्यावेळी आम्ही कधी बारामती बारामती केले आहे का ? असा प्रश्न आमदार शेळके यांनी उपस्थित केला. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांच्यातील वाद लक्षात घेत निधी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करू. तसेच प्रत्येकाला नक्की निधी दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्यानंतर दोघांमधील वाद थांबला. त्यानंतरच या बैठकीत इतर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.