पुणे : जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना खूप घडत असतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हल्ल्यांच्या घटना अत्यंत गंभीर व ज्वलंत बनल्यामुळे जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले 10 बिबटे जामनगर (गुजरात) येथील निवारा केंद्रात आज पाठविण्यात आले. अशी माहिती जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली. जगातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील ‘वनतारा प्राणीसंग्रहालया’त जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथून 4 मादी व 6 नर असे एकूण 10 बिबटे स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्रणिसंग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांनी मान्यता दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, हे बिबटे तीन महाकाय वातानुकूलित ॲंम्ब्युलन्स मधून नेण्यात येत असून एका वातानुकूलित ॲंम्ब्युलन्स मध्ये 5 बिबटे नेण्याची क्षमता असून दोन ॲंम्ब्युलन्समध्ये 10 बिबटे तर एक ॲंम्ब्युलन्स ही अतिताडीच्या मदतीसाठी सोबत असणार आहे. जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे या तीन ॲंम्ब्युलन्स आज सकाळी पोहचल्या. या ॲंम्ब्युलन्ससोबत गुजरात येथील झु मॅनेजर, पशुवैद्यकीय अधिकारी व 23 मॅनेजमेंट टीमचे सदस्य पोहचले व माणिकडोह व वनविभाग जुन्नरचे 15 अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने आज लगेचच दिवसभरात 10 बिबटे गुजरातमधून आणलेल्या पिंजऱ्यात दिवसभरात चढवण्यात आले. अमोल सातपुते उपवनसंरक्षक जुन्नर, अमित भिसे, सहायक वनसंरक्षक जुन्नर, प्रदीप चव्हाण, वनपरीक्षेत्र अधिकारी जुन्नर व माणिकडोह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे 10 बिबटे पिंजऱ्यात सुरक्षित दखल करण्यात आले.
अधिकाऱ्यांसह 20 ते 25 जणांचे पथक..
आज या 10 बिबट्यांची पाठवणी करण्यात आली आहे. बिबट्यांना घेऊन जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह 20 ते 25 जणांचे गुजरातचे पथक ॲंम्ब्युलन्ससोबत असणार आहे. हायड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय या महाकाय ॲंम्ब्युलन्समध्ये असल्याने हे सर्व बिबट सुरक्षितपणे ॲंम्ब्युलन्समध्ये चढवले गेले. जुन्नर ते जामनगर हा प्रवास लांबचा असल्याने ॲंम्ब्युलन्समध्ये बिघाड झाल्यास वा अन्य समस्या उद्भवल्यास ‘ब्रेकडाउन व्हॅन’ ही दिमतीला देण्यात आली आहे.