तुषार सणस
सारोळा : भोर तालुक्यातील न्हावी 322 गावामध्ये कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी तत्कालीन सरपंच व विद्यमान सदस्य गणेश सोनवणे यांना सदस्य पदावरून काढण्याचे लेखी आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी २० जून रोजी दिले. अशी माहिती भोर तालुका प्रहारचे उपाध्यक्ष अजय कांबळे यांनी कापूरहोळ येथील पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटना, संस्थापक अध्यक्ष रमेश गणगे, प्रहारचे माजी अध्यक्ष संतोष मोहिते, संतोष पारठे, गणपत पारठे, मिलिंद तारु, जगवाय सपकाळ, विजय गायकवाड, लव्हाजी मालुसरे, रामचंद्र कोढाळकर, बाळासाहेब पवार उपस्थित होते.
भोर तालुका प्रहारचे उपाध्यक्ष अजय कांबळे यांनी सरपंच गणेश सोनवणे यांच्या वर मासिक सभा न घेणे, रजिस्टर मध्ये खाडाखोड करणे, शासकीय जमीन बेकायदेशीर पणे विकणे, बनावट मृत्य दाखले तयार करणे, १५ वा वित्त आयोगाचा निधी बेकायदेशीररीत्या खर्च करणे, असे अनेक आरोप करीत तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाची चौकशी गटविकास अधिकारी पंचायत समिती भोर यांनी करून अहवाल पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे सादर केले होते. या प्रकरणाची चौकशी करून सोनवणे यांनी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी त्यांना तत्कालीन सरपंच व सदस्य पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.