लोणी काळभोर : सुरक्षित, कमी खर्चात सुखकर व आरामदायी प्रवास व्हावा म्हणून अनेक नागरिक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसला प्राधान्य देतात. नागरिकांना अत्यल्प दरात सुविधा मिळाव्यात म्हणून सरकारने अनेक लोकहितकारी योजना सुरु केल्या आहे. अपंग, दिव्यांग, स्त्रिया, विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांशी आदराने वागणूक देणे, त्यांना मदत करणे, हे बसच्या चालक व वाहकांचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र लोणी काळभोर (ता. हवेली) येथील अपंग असलेल्या जेष्ठ नागरिकाला बस चालक व वाहकाने अरेरावीची भाषा करून अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार आज सोमवारी (ता.19) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून एसटी बसने प्रवास करावी की नको? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद शिवाजी कांबळे (वय- 70, कदमवाकवस्ती, ता. हवेली) हे पत्नी व मुलीसोबत त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त मूळगावी लातूर येथे चालले होते. लोणी काळभोर येथे गाडी थांबत नसल्याने ते सर्वजण रिक्षाने हडपसर येथे बस पकडण्यासाठी गेले होते. प्रल्हाद कांबळे वयोवृद्ध असून ते एका पायाने अपंग आहेत.
हडपसर येथून कांबळे कुटुंब एका बसमध्ये सोमवारी (ता.8) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बसले. मात्र त्यांना कांबळे अपंग असल्याने त्या बस वाहकाने कांबळे व त्यांचा कुटुंबाला बसमधून खाली उतरविले. त्यानंतर कांबळे कुटुंबाने पुन्हा लातूरला जाणारी दुसरी बस पकडली. बसमध्ये बसल्यानंतर पुन्हा बस चालक व वाहकाने कांबळे हे आजारी आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना बसमध्ये बसता येणार नाही. असे सांगितले तेव्हा कांबळे म्हणाले मला काय झाले? मी ठणठणीत आहे. मी आजारी नाही तर मी अपंग आहे. त्यामुळे माझी काळजी करू नका. तुम्ही बस जाऊद्या लातूरकडे असे सांगितले.
असे संभाषण होत बस पुणे सोलापूर महामार्गावरून शेवाळवाडी येथे आली. त्यानंतर कांबळे कुटुंब व बस चालक-वाहक यांच्यामध्ये पुन्हा वादावादी झाली. व एसटी बस चालक व वाहकांनी कांबळे कुटुंबाला खाली उतरविण्यासाठी आग्रही झाले. मात्र कांबळे कुटुंब काही केले तरी ऐकण्यास तयार नसल्याने वाहकाने चालकाला बस थेट लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले.
दरम्यान, कांबळे कुटुंबाने मदतीसाठी त्यांच्या ओळखीचे कदमवाकवस्तीचे (ता. हवेली) तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित बडदे व विजय सकट यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर एसटी बस लोणी काळभोर येथील पोलीस ठाण्याजवळ आली. आणि चालक व वाहकांनी एसटीमध्ये आजारी रुग्ण आहे. त्यांना खाली उतरावा असे लोणी काळभोर पोलिसांना सांगितले. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील एक महिला पोलीस कर्मचारी बसमध्ये गेल्या. त्यानंतर कांबळे यांच्या तब्येतीविषयी माहिती घेतली.
तेवढ्यात त्या ठिकाणी अभिजित बडदे व विजय सकट हे दोन्ही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चालक व वाहकांना अपंग असल्याने प्रवास करता येणार नाही का? अशी विचारणा केली. यावेळी त्यांच्याच शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर हा गोंधळ थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहचला. यावेळी बसमधील प्रवाश्यांनी हस्तक्षेप केला. आणि आम्हालाही गावी जायचे आहे. जाण्यासाठी खुप उशीर होत चालला आहे. त्यामुळे हा वाद येथेच मिटवा. अशी विनंती केली. त्यानंतर या विनंतीला सर्वांनी मान देऊन हा वाद मिटविला. त्यानंतर पुन्हा सर्वजण बसमध्ये बसले. व बस लातूरकडे रवाना झाली.
माणुसकी हरवली?
एसटी बसमधील चालक व वाहकाच्या एका चुकीमुळे 30 हून अधिक प्रवाश्यांना एक तास खोळंबा झाला. तर अपंग नागरिकाला अपमानास्पद वागणूक मिळाली. शासकीय बसमध्ये अशी वागणूक मिळत असेल तर गोरगरीब व सर्वसामान्य प्रवास कशाने करायचा? असा सवाल उपस्थित होतो. तसेच चालक व वाहकाच्या एका चुकीच्या भूमिकेमुळे माणुसकी मेली की काय? असा प्रश्न तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. या घटनेतील नेमके दोषी कोण? यांच्यावर प्रशासन काय कारवाई करणार? की त्यांना मोकाट सोडून दिले जाणार? या प्रश्नांची उत्तरे म्हणजे एक न उलघडणारे कोडे होय.