बारामती : राज्यातील राजकारणात या वर्षभरात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली आहे. त्यातच आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी आज १८ नोव्हेंबरला भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धातास बंद दाराआड चर्चा झाली. (sharad pawar)
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे बारामती येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यासाठी १७ नोव्हेंबरला रात्रीपासून बारामती येथील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी होते. शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्या निवास्थानी भेट घेतली. यावेळी पवार आणि वडेट्टीवार यांच्यात अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली आहे. त्यानंतर पवार यांच्या समवेत वडेट्टीवार यांनी कृषी विकास प्रतिष्ठानच्या अटल इनक्यूबेशन सेंटरला भेट देण्यासाठी गेले. (vijay Wadettiwar)
या चर्चेत नेमकं काय झाले? विजय वडेट्टीवार यांनीच सांगितलं
पवार यांच्यासोबत आरक्षणाबरोबरच राजकीय विषयांवर चर्चा झाली असून ओबीसीच्या वाट्यातले आम्ही कोणी देणार नसल्याचं त्यांनी सांगितले, परंतु मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. आगीत तेल ओतण्याचे काम जे कोण करत असतील त्यांनी ते बंद करावे. समाजा समाजात भांडणे लावली जात आहेत.
कोण मराठा समाजाच्या मागे, तर कोण ओबीसी समाजाच्या मागे उभा राहत आहे. सत्ताधारी पक्षाचे मंत्री छगन भुजबळ ओबीसीची भूमिका मांडतात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे यांच्या पाठीशी आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.(Baramati news)
राजकीय चर्चा काय ?
शरद पवार साहेब यांच्यासोबत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र ही चर्चा मी माध्यमांपुढे उघड करणार नाही. सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत. तुम्ही सगळे सांगा, असे म्हणाले तर प्लॅनिंग ओपन होतो. त्यामुळे आम्ही काय करणार आहोत, ते पुढच्या व्यक्तीला माहीत होईल. त्यामुळे मी सगळं सांगणार नाही.