पुणे : नवनियुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी अॅक्शन मोडवर आल्याच दिसत आहे. दुचाकीस्वार पुणे पोलीस कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट बंधनकारक करण्यात आलं आहे. हेल्मेट घालून न दिसल्यास थेट पोलिसांवरही कारवाई होणार आहे, असे आदेश नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. मात्र, पुणेकरांसाठी अजून हेल्मेट सक्ती करण्यात आली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस दलातील कर्मचारी विनाहेल्मेट शहरात फिरत असल्याचे फोटो प्रसार माध्यमांनी प्रशिद्ध केले होते. त्यानंतर सगळे नियम हे सर्वसामान्यांसाठीच आहेत का?, असा सूर नागरिकांकडून ऐकायला मिळत होता. त्यामुळे शहरातील पोलिसांसाठी हेल्मेट सक्ती केली आहे आणि कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
नवनियुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर थेट हेल्मेट संदर्भात जनजागृती करु, असं सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवस त्यांनी हेल्मेट सक्ती संदर्भात जनजागृती केली मात्र पुणे पोलिसच हेल्मेट वापरत नसल्याचं समोर आलं. त्यामुळे आता थेट पुणे पोलिसांनाच हेल्मेट सक्तीचे आदेश काढले आहेत. शहरात अपघाताचं प्रमाण वाढताना दिसत आहे. यामध्ये रोज अनेकांना अपघातामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे पुण्यात हेल्मेट संदर्भात जनजागृती करून काही महिन्यांनी नागरिकांना देखील हेल्मेट सक्ती लागण्याची शक्यता आहे.