पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धमार्दाय रुग्णालय असून, येथे गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही, हे पाहण्यासाठी धमार्दाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने रुग्णालयाला भेट देऊन अहवाल शासनाला सादर केला आहे. या रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा ३० कोटींपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
धमार्दाय सहआयुक्त, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अधिकारी, जे.जे.चे अधीक्षक, विधी व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव चौकशी समितीत होते. काही दिवसांपूर्वीच या समितीने रुग्णालयाला भेट देऊन अहवाल शासनास सादर केला होता.
राज्यात ४८६ धमार्दाय रुग्णालये असून, गरीब रुग्णांसाठी २० टक्के बेड्स राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यात ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख ८० हजारांपर्यंत आहे, अशा रुग्णांकरिता १० टक्के बेड्स आरक्षित आहेत. त्यांच्यावर मोफत उपचार करणे अपेक्षित आहे. तर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख ८० हजार ते ३ लाख ६० हजारांपर्यंत आहे, अशा रुग्णांसाठी १० टक्के बेड्स आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. या रुग्णांना ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार देणे बंधनकारक आहे.