पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातही उभी फूट पडली. या फूटीनंतर अजित पवार गटातील नेत्यांनी थेट अध्यक्ष खासदार शरद पवार यांना टार्गेट केलं होतं. यामुळे दोन्ही गटात तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. अशातच सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.
पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होते. या भेटीनंतर वळसे-पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वळसे-पाटील म्हणाले, “ही पूर्वनियोजीत भेट होती. रयत शिक्षण संस्थेतील काही अडचणींबद्दल अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर चर्चा झाली. या बैठकीत रयत शिक्षण संस्थेतील अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी वेगळी कुठलीही चर्चा झाली नाही.”
या भेटींमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, याबद्दल प्रश्न विचारल्यावर दिलीप वळसे-पाटलांनी म्हटलं, “कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याचं काही कारण नाही. वसंतदादा शुगर, रयत शिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, राज्य कारखाना आणि राष्ट्रीय कारखाना संघ या संस्थांवर मी काम करत आहे. तसेच येथे काम करताना नेहमीच शरद पवारांचं मार्गदर्शन घेत आलो आहे.