पुणे : पुढील खरीप हंगामात देशभरात ई-पीक पाहणी म्हणजेच पिकांच्या नोंदणीसाठी एकच ॲप वापरण्यात येणार आहे. ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ या ॲपच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करण्यात येणार आहे. याची यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात प्रायोगिक चाचणी देखील घेण्यात आली आहे. आता यंदाच्या उन्हाळी हंगामात ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ या ॲपच्या माध्यमातून ३४ जिल्ह्यांमधील प्रत्येकी एका तालुक्यात राबविण्यात येणार आहे.
जवळपास साडेतीन हजारांहून अधिक गावांमध्ये करण्यात येणाऱ्या पिकांच्या नोंदणी थेट सातबारावर होणार आहेत. संबंधित गावे वगळून अन्य ठिकाणी राज्य सरकारचे ई-पीक पाहणी ॲप वापरले जाणार आहे. पूर्वी पिकांची नोंदणी सातबारावर करण्यासाठी गावातील तलाठी हे कार्यवाही करीत होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने ई-पीक पाहणी हे ॲप सुरू केले. त्यानुसार तिन्ही हंगामातील पिकांची नोंदणी या ॲपनुसारच झाली. यंदाच्या खरीप हंगामात केंद्र सरकारच्या सर्वेक्षण निर्देशानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील २ गावे व नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सर्व गावे अशा ११४ गावांमध्ये डिजिटल क्रॉप सर्व्हे या केंद्र सरकारच्या ॲपनुसार प्रायोगिक तत्त्वावर ई-पीक पाहणी करण्यात आली. तर रब्बी हंगामात गावांची संख्या ११४ वरून १४८ इतकी करण्यात आली असून, प्रत्येक जिल्ह्यातील ३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. उन्हाळी हंगामात साडेतीन हजारांहून ॲपद्वारे ई-पीक पाहणी नाेंदणी करण्यात येणार आहे.
उताऱ्यावर खरीप व रब्बी हंगामात राज्य सरकारच्या ई-पीक पाहणी ॲपच्या व्यतिरिक्त डिजिटल क्रॉप सर्व्हे यानुसार दुहेरी नोंदणी करण्यात आली होती. मात्र, आता मात्र उन्हाळी हंगामात या साडेतीन हजार गावांमध्ये एकच पीक पाहणी ती देखील डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या नेहमीच्या ई-पीक पाहणीच्या नोंदी थेट सातबारावर नोंदविल्या जातात. उन्हाळी हंगामातील या साडेतीन हजार गावांमध्ये होणाऱ्या डिजिटल क्रॉप सर्व्हेच्या नोंदीदेखील आता थेट सातबारा उताऱ्यावर घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे या गावांमध्ये एकच पीक पाहणी होणार आहे.