लोणी काळभोर: आपल्याला अनेकदा शासकीय कामांसाठी महत्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते. काही वेळा आवश्यक ती कागदपत्रे आपल्याजवळ उपलब्ध नसल्याने आपल्या कामाला विलंब होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत कागदपत्रांअभावी काम थांबू नये म्हणून केंद्र सरकारने डिजी लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देशभरात डिजी लॉकरमधील कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातात. मात्र, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ॲक्सिस बँकेमध्ये डिजी लॉकरचा पुरावा ग्राह्य धरला जात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याचा फटका एका ग्राहकाला मंगळवारी (ता.२८) बसला असून, तब्बल दोन तास अडवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बँकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील एक ग्राहक बँकेत पैसे काढण्यासाठी मंगळवारी गेला होता. त्याच्याजवळ तो ज्या कंपनीत काम करतो, तेथील आयडी कार्ड दाखविले असता, त्याला ते आयडी कार्ड चालणार नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर त्याने बँकेचे व्यवस्थापक निलेश गुंड यांच्याशी संपर्क केला. तेव्हा गुंड यांनी तनुजा शहा यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. शहा यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी ग्राहकाच्या हातात एक कागद दिला. तेव्हा त्याने एखाद्याकडे ओळखपत्र नसेल तर बँकेकडे काही तरी पर्याय असेल ना? असे म्हणताच त्यांच्याकडून नकार आला.
थोड्या वेळाने ग्राहकाने पुन्हा तनुजा शहा यांना व्हॉट्सऍपवर किंवा झेरॉक्स चालते का? असे विचारले. तेव्हा तनुजा शहा म्हणाल्या, ”हे चालणार नाही. ओळखपत्र हे मूळ असायला हवे”. त्यानंतर त्याने ”शासनाचे डिजी लॉकर चालत असेल ना?” असेही विचारले. तेव्हा त्यांनी ”अजिबात चालत नाही”, असे म्हणत सहकार्य करण्यास स्पष्टपणे नकारच दिला.
वरिष्ठांकडे जाऊनही सहकार्य नाहीच…
या सर्व प्रकारानंतर संबंधित ग्राहकाला कागदपत्रे नसेल तर शाखाधिकारी किंवा बँकेच्या वरिष्ठांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला. वरिष्ठांकडे जाऊन काहीतरी तोडगा निघेल, असे वाटत असताना मात्र तेथूनही त्यांना कोणतंही सहकार्य केलं गेलं नाही. परिणामी, ग्राहकाची घोर निराशा झाली.
तब्बल दोन तास ग्राहकाची अडवणूक
डिजी लॉकरमधील कागदपत्रे शासकीय कामांसाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातात. मात्र, ग्राहकाने दाखविलेली डिजी लॉकरमधील आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना हे ग्राह्य धरणे अपेक्षित होते. मात्र, ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकाची अडवणूक करून तब्बल दोन तास विलंब केला. सर्व काही कायदेशीर असूनही कामात चालढकलपणा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार? याकडे कदमवाकवस्ती व लोणी काळभोर येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दुसऱ्या बँकेकडे डिजी लॉकरला मान्यता
दरम्यान, संबंधित ग्राहकाने जवळच्याच दुसऱ्या एका सरकारी बँकेकडे जाऊन तिथं डिजी लॉकरमधील कागदपत्रे चालतात का? अशी माहिती घेतली असता तेथे डिजी लॉकरमधील कागदपत्रे कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरली जात असल्याचे समोर आले. त्यामुळे ॲक्सिस बँकेने हे असले त्रास देणारे धोरण का आखल, याचा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
डिजी लॉकरमधील कागदपत्रे कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य
आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, शैक्षणिक कागदपत्रे किंवा अन्य महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित सांभाळता यावी यासाठी केंद्र सरकारने दिलेली सुविधा म्हणजे डिजी लॉकर. यामधील कागदपत्रे हवी तेव्हा, हवे तेथे डाऊनलोड करता येतात आणि त्याची प्रिंटही काढता येते. अनेक सरकारी ठिकाणी किंवा सरकारी फॉर्म भरताना, बँकेत नवीन खाते उघडताना अथवा इतर कोणत्याही अॅपमधील तुमची कागदपत्रे किंवा मोबाईलमधील कागदपत्रांचे फोटो ग्राह्य धरले जात नाहीत. मात्र, डिजी लॉकर हे शासनाकडून प्रमाणित करण्यात आलेलं वॉलेट असल्याने या वॉलेटमधील कागदपत्रं सरकारी कामांसाठी ग्राह्य धरली जातात.
डिजी लॉकर चालत नाही, असे लिहून द्या असे ग्राहक म्हणाले. त्यावर व्यवस्थापक आल्यानंतर त्यांच्याकडून लिहून घ्या, असे तनुजा शहा यांनी सागितले. त्यानंतर मूळ आधार कार्ड घरून घेऊन आल्यानंतर पैसे दिले.