शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथून यापूर्वी एका कंटेनरचे डिझेल चोरीसह नंतर एकाच वेळी सहा कंटेनरच्या बॅटऱ्या व डिझेल चोरीला गेल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एका कंटेनरचे डिझेल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याबाबत संदीप शामराव राऊत (रा. हिंगणी फाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे..
राजमुद्रा चौकातील वैष्णवी टायर्स येथे संदीप राऊत यांनी त्यांचा कंटेनर काही कामानिमित्ताने लावलेला होता. चालक रात्री कंटेनर मध्ये झोपला होता. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास चालक उठला असता त्याला कंटेनरच्या डिझेल टाकीचे झाकण उघडे असल्याचे दिसल्याने त्याने पाहणी केली असता कंटेनरमधील डिझेल चोरीला गेल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब येळे हे करत आहेत.