पुणे : पुणे शहरात कोयता गंगने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. रिक्षाचालकाला आणि त्याच्या कुटुंबीयांना धारधार शस्त्रे आणि दगडाने मारहाण करीत कोयता गँगने धुडगूस घालत २० ते २५ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना हडपसर भागातील रामटेकडी येथील ठोंबरेवस्तीमध्ये रविवारी १० जून रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
याप्रकरणी कपिल दत्तात्रय तांदळे (रा. ठोंबरेवस्ती, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून लड्डू ऊर्फ साहिल वाघेला, टिल्ली ऊर्फ इरफान शेख, अजय विजय उकिरडे, बप्पी हेमंत दोडके, राहुल ताटे, अभिजित अशोक काकडे (सर्व रा. रामटेकडी, हडपसर) यांना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कपिल तांदळे हे रिक्षाचालक आहेत. ते काम संपवून घरी निघाले होते, त्यावेळी आरोपी अजय उकिरडे आणि इतर आरोपींनी तांदळे यांना रामटेकडी येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळ अडविले. यानंतर आरोपी अजय आणि लड्डू याने फिर्यादी यांचा मोबाईल हिसकावून घेतला, तर इरफान शेख आणि राहुल यांनी खिशातील ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेत असताना फिर्यादी यांनी नकार दिला. याचा राग आल्याने आरोपी लड्डूने फिर्यादी यांच्या तोंडावर मारले, तर इतर आरोपींनी रिक्षावर दगड फेकले.
तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या ७ ते ८ दुचाकी ढकलून दिल्या. त्यानंतर चारचाकी गाड्यांच्या काचांवर दगड, विटा, पेव्हर ब्लॉक, फरशांचे तुकडे मारून नुकसान केले. यानंतर फिर्यादी हे घरी गेले असता आरोपी त्यांच्या मागे गेले आणि त्यांना मारहाण करू लागले. हे पाहून फिर्यादी यांच्या कुटुंबातील सदस्य हे भांडणे सोडविण्यासाठी आले. आरोपींनी त्यांनासुद्धा धारधार शस्त्र दगड, विटांनी मारहाण केली. यात फिर्यादी त्यांचा भाऊ किरण अभिषेक, मुलगा हर्षवर्धन जखमी झाले.
दरम्यान, आरोपींनी परिसरात दहशत माजवत आम्ही या वस्तीतले भाई आहोत. आमच्या नादाला कोणी लागायचे नाही. कोणी मध्ये आले तर त्याची विकेट पाडू, अशी धमकी दिली. आरडाओरडा करून परिसरात पार्क केलेल्या ६ रिक्षा, ७ ते ८ दुचाकी, ४ ते ५ कार २० ते २५ वाहनांची तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास वानवडी पोलिस करत आहेत.