पुणे : पोलिसांच्या पथकावर गोळीबार करुन पसार झालेल्या अट्टल गुन्हेगाराला पकडण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. हे दरोडेखोर पुण्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यात घरफोडी तसेच दरोडा घालण्याचे गुन्हे करत होते. त्यांना पकडण्यासाठी सोलापूर आणि नगर पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. अखेर हडपसर परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हगाराला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हंसराज रणजीतसिंग टाक (वय १८, रा. हडपसर) असे अटक केलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. गुन्हे शाखेतील युनिट सहाचे पथक हडपसर भागात गस्त घालत असताना आरोपी टाक हा कालवा रस्ता परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी नितीन मुंढे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून टाक याला ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपीची चौकशी केली असता त्याने पुणे शहरातील हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद परिसरात घरफोडीचे नऊ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. सहा लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.