संदीप टूले
Baramati News: केडगाव : संपूर्ण महाराष्ट्रातच आता मराठा ओबीसी तसेच धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. तसेच आता मराठा समाजासह धनगर समाजानेही आरक्षणासाठी आता कंबर कसायला सुरुवात केली असून, बारामती येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाने (दि.१६) गुरुवारी बारामती बंदची हाक दिली आहे. त्याबाबतचे निवदेन ही सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
बारामती येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून धनगर समाज बांधव बेमुदत उपोषणास बसले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले पत्र देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धनगर समाजाच्या आरक्षण मागणीस संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.
अजित पवार बारामतीत असतानाही उपोषणकर्त्यांकडे कानाडोळा
या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असूनही सरकारच्या वतीने कोणीही अद्याप दखल घेतली गेलेली नाही. दरम्यान, महाराष्ट्रातील धनगर बांधवाकडून सरकारचा तसेच बारामतीत दिवाळीनिमित्त चार दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत. तरी देखील त्यांनी भेट तर सोडाच पण साधी उपोषणकर्त्याची चौकशीही केली नसल्यामुळे धनगर बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बारामतीत त उपोषणकर्त्यांची तब्बेत खालावली
बारामतीत सुरू असलेल्या धनगर समाजाच्या बेमुदत उपोषणकर्त्यांपैकी काही आंदोलकांची आज प्रकृती खालावली. या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर बांधवांनी उद्या बारामती बंदची हाक दिली आहे. त्याबाबतचे निवदेन धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.