केडगाव / संदीप टूले : धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. धनगर आरक्षणाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. राज्यातील संपूर्ण धनगर समाजाचे या निकालाकडे लक्ष लागले होते. याचिका फेटाळल्याने हा धनगर समाजासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मागील अनेक दिवसांपासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या याचिकेवर सुनावणी सुरू होती. ती पार पडल्यानंतर आज न्यायालयाने निकाल दिला आहे. न्या. पटेल आणि न्या. कमल खटा यांच्या खंडपीठाने निर्णय दिला की, अशा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याचा आम्हाला अधिकार नाही. हा सर्वस्वी अधिकार संसद आणि संसद मंडळाचा आहे. कायद्यात दुरुस्ती करत संसदेतूनच हे आरक्षण दिलं जाऊ शकतं. असं म्हणत एसटीमधून आरक्षण देण्यासंबंधीत सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत.
दरम्यान, हायकोर्टाच्या या निर्णयानंतर आता धनगर समाजाचे नेते व याचिकाकर्ते आणि पुढे कायदेशीर भूमिका काय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेली अनेक वर्षे धनगर समाजाची फक्त फसवणूक
गेली कित्येक वर्षे धनगर समाजाची फक्त फसवणूक होत असून, सगळ्याच पक्षांचे राजकारणी आपला स्वार्थ साधण्यासाठी धनगर समाजाचा उपयोग करून घेतला आणि घेत राहतील, यासाठी धनगर समाजाच्या खासदार-आमदारपासून ते गावच्या सरपंचापर्यंत सर्वांनी समाजाच्या हितासाठी एक झालं पाहिजे. आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी लढले पाहिजे.
– भरत गडधे, रासप, हवेली तालुका अध्यक्ष