मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. ५) मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पोस्टर्सनी मुंबईतील आझाद मैदानाचा परिसर व्यापला असल्याचे पाहायला मिळाले.
भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी सकाळी एकमताने निवड करण्यात आली. लगेचच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पाठिंब्याचे पत्र सोबत घेत एकूण २३७ आमदारांच्या सहीचे पत्र घेऊन त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. हे पाठिंब्याचे पत्र सादर करत राज्यपालांकडे फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा केल्यावर, राज्यपालांनी महायुतीच्या नेत्यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचरण केले. गुरुवार, ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडला.
तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राज्यांचे १९ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह एनडीएमधील मित्रपक्षांचे नेते यांच्या साक्षीने देवेंद्र फडणवीस गुरुवार, ५ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी फडणवीस यांच्यासमवेत दोन उपमुख्यमंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली.
उत्सुकता नव्या देवाभाऊ पर्वाची
२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालावधीत ‘देवेंद्र पर्व’ महाराष्ट्राने अनुभवल्यानंतर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्यानंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खरी, पण ते २.० हे ‘देवेंद्र पर्व’ केवळ ७२ तासांचे औटघटकेचे ठरले होते. गेल्या काही दिवसांपासून भाजप कार्यकर्त्यांमध्ये ‘देवाभाऊ’ म्हणून नावारुपाला आलेले फडणवीस आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याने या ‘देवाभाऊ’ पर्वाची सर्वांना उत्सुकता आहे.
शपथ विधीसाठी कोण-कोण उपस्थित
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिम्मंता बिस्वा, गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार, अरुणाचल सीएम पेमा खंडू, उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
सलमान खान, शाहरुख खान, सचिन तेंडूलकर, विक्रांत मेसी, जय कोटक, एकता कपूर, मुकेश अंबानी, अनंत अंबानी, जानवी कपूर, विद्या बालन, सिद्धार्थ कपूर, वरुण धवन, अनिल अंबानी, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, रणबीर कपूर, रणवीर सिंह, गीतांजली किर्लोस्कर, बिरेन्द्र सराफ, राजेश अदानी, मनोज सैनिक, के के तातेड़, मृदुला भाटकर, निखिल मेसवानी, हेतल मेसवानी, नीरजा चौधरी, योगेश पुढारी, रोहित शेट्टी, अर्जुन कपूर, सतीश मेहता, एटली, बोनी कपूर, श्रद्धा कपूर, बादशाह, जयेश शाह, जॉन इब्राहिम, विकी कौशल, खुशी कपूर, रुपाली गांगुली, सुधाकर शेट्टी, धवल मेहता, आलोक संघवी, ज्योति पारेख, आलोक कुमार, अरविंद कुमार हे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले.
दरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी चर्चा आज दिवसभर होती. परंतु, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार की नाही याबाबात अनेक संभ्रम निर्माण झाले होते. अवघे दोन तास शपथविधीसाठी बाकी असताना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याबाबतचे पत्र राजभवनात देण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.