पुणे : आमदार सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयातील एका कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने वाद पेटला आहे. आता राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. सत्तेत असलेल्या जबाबदार व्यक्तीने पोलिसांना जी वागणूक दिली, ती एका बेजबाबदार व्यक्तीलाही शोभत नाही. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहे. वर्दीला काही मानसन्मान आहे. पोलिसासह दुसऱ्या पक्षातील माणसाला मारणे देखील चुकीचे आहे. राज्यातील पोलीस दलाचा मला अभिमान आहे. तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे नाव घेता तर तुमच्या पक्षाला अगोदर ती संस्कृती शिकवा. अशा घटना का सहन करायच्या? असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलच्या कार्यक्रमात झालेल्या मारहाणीच्या प्रकाराचा सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. सुळे म्हणाल्या की, पुणेकरांना त्यांच्या संस्कृतीचा, भाषेचा अन् अनेक गोष्टींचा अभिमान आहे. मात्र, याच पुण्यात ही लाजिरवाणी गोष्ट घडली आहे. मी सातत्याने दौऱ्यावर असते. ज्या विश्वासाने मी महाराष्ट्रभर फिरते, तशी दुसऱ्या राज्यात फिरत नाही. मला येथील राज्य पोलीस दलावर विश्वास आहे. यामुळेच पुण्यात घडलेल्या घटनेचा मी निषेध नोंदवते.
देवेंद्र फडणवीस यांचा मला आदर आहे. त्यांनी समोर येऊन बोलायला हवं होतं की, माझ्या पोलिसावर कोणी हात उचलला तर मी सहन करणार नाही. ते काहीच बोलत नसतील, तर मिर्जापुर आणि पुण्यात काय फरक आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी जाहीर पत्र लिहिणार आहे. तुम्ही जर कारवाई करणार नसाल, तर कसं चालेल. तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे नाव घेता, तर तुमच्या पक्षाला अगोदर ती संस्कृती शिकवा. आपण अशा घटना का सहन करायच्या, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.