पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हीच परिस्थिती उद्भवू नये यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या यावर भाजपात अंतर्गत खल सुरु आहेत. भाजपाकडून महाराष्ट्र सरकार, तसेच केंद्र सरकारच्या योजनांचा जोरदार प्रचार सुरु आहे.
असं असताना उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विरोधकांच्या आरोपांना जोरदार उत्तर देण्याचा आदेश दिला आहे. प्रत्येकवेळी आदेशाची वाट पाहू नका. थेट मैदानात उतरा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आज 21 जुलै रोजी प्रदेश भाजपाच्या महाअधिवेशनात देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत. विरोधक म्हणतात सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. आम्ही 2013 सालच्या सिलिंडरच्या किमती दाखवल्या. त्या सध्याच्या किमतीपेक्षा अधिक होत्या. या किमती दाखवल्यानंतर ते गप्प बसतात. आपली एक अडचण आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं. पण प्रत्येकजण आदेशाची वाट बगत बसतो. आदेश आला तर मी उत्तर देईन. नाहीतर देणार नाही, असे प्रत्येकजण म्हणतो, असं फडणवीस म्हणाले.
पुढे म्हणाले, आज तुम्हाला परवानगी देतो. ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने थेट मैदानात उतरून करावी. पण अट एकच आहे. हीट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे, सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की, समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. ते असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात. बाकी आदेश विचारू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा, असे आदेशच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.