इंदापूर,(पुणे) : कार्यकर्ता हा सैनिक असतो, त्यांचे एकच लक्ष असते की, आपल्या सेनापतीसाठी आपल्याला लढायचे आहे. सेनापतींचे काम असते की, आपल्या सैनिकांना योग्य दिशा द्यायची, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना साहजिकच आहेत. आमच्या सर्व सैनिकांना आम्ही निश्चितपणे समजावून सांगू. त्यांचे सेनापतीदेखील त्यांना योग्य प्रकारे सांगतील.
सर्वांना न्याय मिळेल, अशी व्यवस्था आम्ही येत्या काळात उभी करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज इंदापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीवर वक्तव्य केलं आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही तीन पक्ष एकत्र आलो आहोत. विशेषतः राष्ट्रवादीसोबत आमची लढत झाली आहे. त्यामुळे समन्वय साधावा लागतो. समन्वय साधण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न सुरु असणार आहे. राष्ट्रवादीशी उत्तम समन्वय आहे. सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी सोनाई डेअरीचे प्रवीण माने यांच्याबाबतही वक्तव्य केलं म्हणाले, माने दादा आणि माझे जुने संबंध आहेत. ते बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे लागले होते की तुम्ही इंदापूरला येता परंतु माझ्याकडे येत नाही, म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की, ज्यावेळेस येईल त्यावेळेस चहा पाण्याला येईल. ते आमचे जुने सहकारी आहेत ते आमच्या सोबतच आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.