Dev Diwali 2023 : पुणे : देव दिवाळी ही आपल्या हिंदू संस्कृतीत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सर्व सणांमध्ये शुभ सण म्हणून देव दिवाळीला ओळखले जाते. या देव दिवाळीचे का खास असे महत्व आहे? ते आज जाणून घेऊयात. दिवाळी झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. त्यानंतर, सर्वांना वेध लागतात ते देव-दिवाळीचे. द्वादशी तिथीली तुळशीचे लग्न लावले जाते.
देव दिवाळीचे महत्व काय?
धार्मिक मान्यतेनुसार, देव दिवाळीच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर या राक्षसाचा पराभव केला होता. म्हणून हिंदू धर्मामध्ये देव दिवाळीचे खास महत्व आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देव दिवाळीचा सण साजरा केला जातो. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला हा देव दिवाळीचा सण साजरा केला जातो. आज देव दिवाळी असून याला कार्तिक पौर्णिमा (त्रिपुरी पौर्णिमा) असे ही म्हटले जाते. चला तर मग या देव दिवाळीचा शुभ मुहूर्त आणि तिथी जाणून घेऊयात.
देव दिवाळीचा शुभ मुहूर्त
यंदाच्या वर्षी देव दिवाळी ही आज अर्थात २७ नोव्हेंबरला साजरी केली जात आहे. या देव दिवाळीच्या पौर्णिमेच्या तिथीची सुरूवात ही रविवारी (२६ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांनी झाली आहे. तर या तिथीची समाप्ती सोमवारी (२७ नोव्हेंबरला) रात्री 12 वाजता होणार आहे. देव दिवाळी ही सोमवारी अर्थात २७ नोव्हेंबरला साजरी केली जात आहे. या देव दिवाळीचा शुभ मुहूर्त हा सोमवारी संध्याकाळी ५ वाजून ८ मिनिटांनी सुरू होणार असून संध्याकाळी ७ वाजून ४७ मिनिटांपर्यंत हा मुहूर्त संपणार आहे. या कालावधीमध्ये तुम्ही देव दिवाळीची पूजा आणि दीपदान करू शकता.
देव दिवाळीच्या दिवशी घरामध्ये, अंगणात आवर्जून दिवे लावले जातात. दिव्यांची आरास केली जाते. या दिवशी दीपदान करण्याचे खास महत्व आहे. भगवान शंकराचा हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सर्व देवी-देवता तीर्थक्षेत्र वाराणसीमध्ये पोहचले होते. तिथे या सर्व देवी-देवतांनी मातीचे असंख्य दिवे प्रज्वलित केले होते. त्यामुळे, या उत्सवाला प्रकाशाचा उत्सव असे ही म्हटले जाते. त्यामुळे, देव दिवाळीला अनेक जण मंदिरांमध्ये जाऊन दिवे प्रज्वलित करतात. तसेच, नदीच्या घाटांवर जाऊन दिवे प्रज्वलित करून ते पाण्यात वाहिले जातात. या दिवशी दिव्यांचे खास महत्व असते.