पुणे : कनिष्ठ लिपीकास निलंबनाच्या कारवाईमध्ये मदत करण्यासाठी तसेच त्यांच्या विरुद्ध एफ. आय. आर दाखल न करण्यासाठी ३ लाख रुपये लाच मागितल्या प्रकरणी पुणे येथील कृषी आयुक्तालयातील उपसंचालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत कनिष्ठ लिपीक यांनी तक्रार दाखल केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे सन २०१९-२०२० मध्ये तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या कार्यालयात कनिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत असताना त्यांनी सुक्ष्म सिंचन (ठिबक सिंचन) च्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये केलेल्या कसुरीच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीअंती कृषी सहसंचालक, अमरावती विभाग यांनी त्यांना दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी सेवेतून निलंबित केले होते.
कृषी आयुक्तालय, पुणे या ठिकाणी उपसंचालक, फलोत्पादन ४ कार्यरत असेलेले लोकसेवक संजय गुंजाळ यांनी तक्रारदारावरील निलंबनाच्या कारवाईमध्ये मदत करण्यासाठी तसेच तक्रारदाराविरुद्ध ठेवलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने चौकशी करुन एफ. आय. आर. दाखल न करण्यासाठी ३ लाख रुपये लाच मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा पुणे येथे लोकसेवक संजय गुंजाळ यांची तक्रार केली होती.
सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक संजय गुंजाळ यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या निलंबनानंतरच्या कारवाईमध्ये मदत करण्यासाठी आणि त्याच्याविरुद्ध एफ. आय. आर. दाखल न करण्यासाठी सुरुवातीस ३ लाख रुपये लाचेची मागणी करुन, तडजोडीअंती २ लाख ५० हजार रुपयाच्या लाचेची मागणी करुन, तक्रारदार यांचेकडून रुपये २ लाख ५०हजार लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता त्याना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यावेळी आरोपी लोकसेवक संजय गुंजाळ यांच्या ताब्यातील FORD ECO SPORT कार क्रमांक MII 15 / GF / 3852 ची तपासणी केली असता, कारमध्ये लाच रक्कम व्यतिरिक्त २ लाख १५ हजार रुपये रोख मिळून आले आहेत. लोकसेवक संजय गुंजाळ यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर, ला.प्र.वि. पुणे हे करत आहेत.